नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च या संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमीत्ताने जे डिजीटल पोस्टर जारी केले आहे त्यातून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो वगळण्यात आला आहे.
या संबंधात ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की हा संवेदनहीनतेचाच नमूना आहे. या संबंधात या संस्थेकडून देण्यात आलेले स्पष्टीकरणही याच स्वरूपाचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की मोटार कारचा जन्मोत्सव साजरा करताना तुम्ही हेन्री फोर्ड यांचा फोटो वगळू शकता काय? किंवा विमानांच्या जन्माचा उत्सव साजरा करताना तुम्ही राईट बंधुंना विसरू शकता काय? याचा विचार केला पाहिजे. फोर्ड यांनी कारचा शोध लावला आहे आणि राईट बंधुंनी विमानाचा शोध लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर आझादीचा अमृत महोत्सव साजरा करताना पंडित नेहरुंचा आपल्याला विसर पडता कामा नये असेही त्यांनी म्हटले आहे.
या संबंधात या संस्थेच्या सदस्य सचिवाने जो बाष्कळ खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना तोंड बंद ठेवण्याचा सल्लाही चिदंबरम यांनी दिला आहे. भारतीय विज्ञान क्षेत्राच्या कार्याचा गौरव करताना आपल्याला सी.व्ही. रामन यांचा विसर पडून चालणार आहे काय असा सवाल करून चिदंबरम यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्याला पंडित नेहरूंचा विसर पडता कामा नये असे म्हटले आहे.