धुळे – साक्री आगारातील एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कमलेश बेडसे असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. अनियमीत पगारामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटातून बेडसे यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
करोना काळानंतर अनियमित पगार आणि त्यामुळे ओढवलेले आर्थिक संकट यामुळे बेडसे यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. चालक बेडसे यांच्या आत्महत्येमुळे साक्री आगारातील कर्मचारी आक्रमक झाले असून आंदोलन सुरु केले आहे. आगारात आणि महामार्गावरील बसेस आहेत त्या तिथेच सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.
मयत बेडसे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंब आणि कर्मचारी संघटनेने म्हटलं आहे. आंदोलनामुळे नागपूर-सुरत महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.