काबूल : तालिबान्यांनी वाऱ्याच्या वेगानं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला हे संपूर्ण जग आज पाहत आहे. याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. त्यातच “हसके लिया अफगाणिस्तान लढके लेंगे पाकिस्तान” या तालिबानी प्रवृत्तीची अमेरिकेला आता धडकी भरली असल्याचे दिसत आहे. कारण अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांच्या हाती अण्वस्त्रही पडतील की काय ? या चिंतेने अमेरिकेला ग्रासले आहे. या सर्व प्रश्नांचे पत्र अमेरिकेच्या खासदार यांनी राष्ट्रपती जो बायडन यांना लिहिले आहे.
अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर आता तालिबानचा रोख हा पाकिस्तानकडे असून त्याला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. तसेच पाकिस्तानातील अण्वस्त्र तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती आता अमेरिकेला वाटत आहे. आता पाकिस्तानने योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केले आहे.
अफगाणिस्तान तालिबानी दहशतवाद्यांनी कोणतीही हिंसा न करता मिळवला आहे. त्यानंतर आता तालिबानला पाकिस्तानचे वेध लागले आहेत. आता यापुढील अमेरिकेची रणनिती काय असेल या प्रश्नांची उत्तरे बायडन यांनी द्यावीत अशी मागणी अमेरिकी खासदारांनी केली आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या कब्जानंतर आता त्यांच्याशी बातचित अमेरिका करणार का? अफगाणिस्तानच्या सीमांचं तालिबानकडून संरक्षण केलं जाऊ शकतं का? शेजारील देशातील अण्वस्त्र ताब्यात घेण्यासाठी तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न कशावरुन केले जाणार नाहीत?, असे सवाल अमेरिकेच्या खासदारांनी उपस्थित केले आहेत.
अमेरिकेतील सीनेट आणि प्रतिनिधी सभेच्या ६८ सदस्यांच्या समूहानं बुधवारी बायडन यांना एक पत्र लिहिलं आहे. यात अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानकडून भविष्यात अण्वस्त्र ताब्यात घेतली जाणार नाहीत यासाठी तुम्ही काही रणनिती आखली आहे का? असे बायडन यांना विचारले आहे.