लीड्स – पहिल्या चारही फलंदाजांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीवर आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या दिवशी चहापानाला वेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 298 धावा केल्या असून 220 धावांची आघाडी घेत सामन्यातील विजय दृष्टिपथात आणला आहे.
भारताचा पहिला डाव केवळ 78 धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव सुरू केला. बुधवारच्या बिनबाद 120 धावांवरून खेळ पुढे सुरू केल्यावर सलामीवीर रोरी बर्न व हसीब हमीद यांनी भारताच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. या दोघांनी पहिल्याच दिवशी अर्धशतके साकार केली होती. या जोडीने 135 धावांची सलामी दिली. बर्न 153 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावत 61 धावा काढून परतला त्यानंतर या कसोटीत स्थान मिळालेल्या डेव्हिड मलान याने जबाबदारीने परंतु आक्रमक फलंदाजी केली. हमीदही स्थिरावलेला असताना 195 चेंडू खेळत 12 चौकारांच्या मदतीने 68 धावांवर बाद झाला.
मलानला साथ देण्यासाठी कर्णधार ज्यो रूट खेळपट्टीवर आला आणि या दोघांनी भारताच्या गोलंदाजीवर सहज आक्रमण केले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 139 धावांची दमदार भागीदारी केली. मलानने अफलातून फलंदाजी करत 70 धावांची खेळी केली. त्यात त्याने 11 चौकार फटकावले. दुसरीकडे या मालिकेत भरात असलेल्या रूटनेही आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा रूट 99 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 80 धावांवर खेळत होता.
वेगवान गोलंदाज महंमद शमीने भारताला बर्नच्या रूपाने पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर हमीदला रवींद्र जडेजाने बाद केले. उपहाराच्या वेळी दोन गडी बाद झालेले असतानाही रूट व मलानने डाव सावरला. या जोडीने द्विशतकी आघाडी मिळवून देताना भारतीय संघावर दडपण वाढवले. त्याचवेळी चहापानाची वेळ जवळ आलेली असताना महंमद सिराजने मलानला बाद केले. चहापानापर्यंत इंग्लंडने 94 षटकांत 3 बाद 298 धावा केल्या असून त्यांच्याकडे आता 220 धावांची आघाडी आहे.
डेक्स्टर यांना खेळाडूंची आदरांजली
तिसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांच्या निधनाचे वृत्त मिळाले. डेक्स्टर यांना दोन्ही संघांनी खेळ सुरू होण्यापूर्वी आदरांजली वाहिली. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडावर काळी फीत लावून खेळ केला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – सर्वबाद 78. इंग्लंड पहिला डाव – 94 षटकांत 3 बाद 298 धावा. (हसीब हमीद 68, रोरी बर्न 61, डेव्हिड मलान 70, ज्यो रूट खेळत आहे 80, जॉनी बेअरस्टो खेळत आहे 0, रवींद्र जडेजा 1-38, महंमद सिराज 1-70, महंमद शमी 1-73).