नवी दिल्ली – विविध उपकरणांमध्ये सेमीकंडक्टरचा वापर वाढणार असतानाच इलेक्ट्रिक वाहनांचे युग सुरू होणार आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टरचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे भारतात आगामी काळात सेमीकंडक्टरचा वापर वाढणार असल्याचे टाटा स्टील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष टी व्ही नरेंद्रन यांनी सांगितले.
एक्मा या वाहनांचे सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना नरेंद्रन म्हणाले की त्यामुळे भारतातील काही कंपन्यांनी सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या संदर्भात सकारात्मक वातावरण निर्मिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या घडामोडीची सरकारनेही दखल घेतलेली आहे. या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी लागते. यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्याची गरज आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा या कंपन्याबरोबरच इतर कंपन्यांच्या उत्पादनावरही सेमीकंडक्टरमुळे परिणाम झाला आहे. भारताने मेक इन इंडिया धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वाहनांचे सुटे भाग भारतात तयार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.