जम्मू – जम्मू काश्मीर प्रदेश भाजपचे नेते रविंद्र रैना यांना दहशतवाद्यांपासून धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गेल्या दोन वर्षात जम्मू काश्मीरात भाजपच्या 23 जणांची हत्या करण्यात आली आहे. याच महिन्यात काश्मीरातील दोन भाजप पदाधिकाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.
17 ऑगस्टला जावेद अहमद दार यांची हत्या करण्यात आली असून 10 ऑगस्टला गुलाम रसुल दार आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. आता मलाही गुप्तचर विभागाकडून अशाच स्वरूपाचा इशारा देण्यात आला आहे असे रैना यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, रेजिस्टंट फ्रंट नावाच्या संघटनेकडून माझ्या विरोधात सोशल मिडीयावर धमकीचे संदेश पाठवले गेले आहेत.
मला काळजी घेण्याची सूचना गुप्तचर यंत्रणांकडूनही करण्यात आली आहे अशी माहिती रैना यांनी पीटीआयला दिली. रेजिस्टंट फ्रंट ही लष्कर ए तोयबाची समर्थक संघटना आहे. तथापि आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही असेही रैना यांनी म्हटले आहे.