न्यूयॉर्क – क्रिकेटच नव्हे तर कोणत्याही खेळाचा एखादा सामना सुरू असताना काही अडथळे येण्याच्या घटना आपण नेहमीच पाहिल्या आहेत. मात्र, अमेरिकेत एका फुटबॉल सामन्यादरम्यान चक्क एक लहान मूल भर मैदानावर अवतरले त्यामुळे खेळाडूंनी खेळ थांबवला.
या मुलाला सुखरूप परत आणण्यासाठी त्याच्या मातेला मात्र प्रचंड धावाधाव करावी लागली. आपली आई आपल्याकडे येत असल्याचे पाहून हे बाळ मैदानभर पळत सुटले व उपस्थितांनीही या क्षणाचा आनंद घेतला.
अमेरिकेतील ओहियोमध्ये एफसी सिनसिनाटी आणि ओरलॅंडो सिटी यांच्यात फुटबॉलचा सामना सुरू होता. सामना सुरू असताना अचानक एक लहान मूल मैदानात अवतरले. सुरक्षारक्षकांनाही हे मूल मैदानात कसे आले याचा थांगपत्ता लागला नाही. मात्र, आपल्या मुलाला कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी त्याच्या मातेने मैदानात धाव घेतली.
मात्र, या मुलाने धावण्यास सुरुवात केली आणि त्याला गाठण्यासाठी त्याच्या मातेलाही धावाधाव करावी लागली. हा सामना पाहात असलेले प्रेक्षक तसेच खेळाडू व पंचांनीही या मजेदार क्षणांचा आनंद घेतला. सध्या या घटनेचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.