लाहोर – पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या एका हिंदू मंदिराची मुस्लिम कट्टरवादी जमावाकडून प्रचंड तोडफोड करण्यात आली. या मंदिराचा काही भाग या जमावाने पेटवून दिला. या गणेश मंदिरातील मूर्तीचीही विटंबना करण्यात आली. ही जाळपोळ आणि तोडफोड रोखण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर पाकिस्तान रेंजर्सना पाचारण करण्यात आले आहे.
रहिम यार जिल्ह्यतल्या भोंग शहरातील मंदिरावर हा हल्ला करण्यात आला.
हल्ला करणाऱ्या जमावाने काठ्या, दगड आणि विटांनी हा हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. हे ठिकाण लाहोरपासून 590 किलोमीटर अंतरावर आहे. मुस्लिम शिक्षण संस्थेची कथित विटंबना करण्यात आल्याची प्रतिक्रिया म्हणून जमावाने ही तोडफोड केली असे पोलिसांनी सांगितले.
Strongly condemn attack on Ganesh Mandir in Bhung, RYK yesterday. I have already asked IG Punjab to ensure arrest of all culprits & take action against any police negligence. The govt will also restore the Mandir.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 5, 2021
या घटनेबाबत पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश गुलझार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून हे प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी ठेवले जाणार आहे. तर, या घटनेबाबत आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील कारवाईचे आदेश दिले आहेत.
तर पंतप्रधान इम्रान खान यांनी या संदर्भात केलेल्या ट्विमध्ये म्हटले आहे की, ”मी रहीम यार खानच्या भोंगमधील गणेश मंदिरावर काल झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आहे. मी अगोदरच पंजाबच्या आयजी यांना सर्व आरोपींना अटक होईल याची खबरदारी घेण्यास आणि पोलिसांच्या कोणत्याही बेजबादार वागणुकीबद्दल कारवाई करण्यास सांगितलं आहे. सरकार मंदिराचा जीर्णोद्धा देखील करेल.” असंही ते म्हणाले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात या शिक्षण संस्थेमधील ग्रंथालयात एका 8 वर्षाच्या हिंदू मुलाने लघुशंका केल्याने भोंग शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता. या मुलाला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण तो अल्पवयीन असल्याने त्याची जामिनावर सुटका केली गेली. त्यानंतर या प्रकाराचा सूड घेण्याचे प्रक्षोभक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट झाले होते.
मंदिरावरील हल्ला झाल्यानंतर सत्तारुढ पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेश कुमार वांकवाणी यांनी या घटनेचे व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केले आणि सुरक्षा दलांना घटनास्थळी रवाना होण्याची विनंती केली. बुधवारपासून ही जाळपोळ सुरू असून स्थानिक पोलीस या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत, ही लाजीरवाणी बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मंदिराची जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणीही डॉ. वांकवाणी यांनी केली आहे.
या ठिकाणी पाकिस्तान रेजर्सना तैनात करण्यात आले आहे आणि मंदिराला बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे रहिम यार खान जिल्हा पोलीस अधिकारी असाद सरताझ यांनी सांगितले. या मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या 10 हिंदू कुटुंबांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
भारताकडून तीव्र प्रतिक्रिया
पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानकडे तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पाचारण करून याबद्दलचा निषेध नोंदवण्यात आला असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये सातत्याने होत असलेल्या अल्पसंख्यांकांवरील हल्ले चिंताजनक आहेत, असे बागची यांनी सांगितले.