नागपूर – ‘फ्रेंडशिप डे’ ला तरूणीवरून झालेल्या वादादून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची मित्रत्वाला काळीमा फासणारी घटना नागपूरातील हिवरीनगर एनआयटी गार्डमध्ये घडली आहे. अनिकेत भोतमांगे (वय-21, गड्डीगोदाम परिसर, नागपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
फ्रेंडशिप डे दिवशी अनिकेत आणि त्याचे मित्र फिरायला गेले होते. यादरम्यान अनिकेत आणि वैभव यांच्यात एका तरूणीवरून वाद झाला. त्यानंतर वैभवने अनिकेतबाबत राग डोक्यात ठेवून त्याला संपवण्याचे षड्यंत्र रचले.
मंगळवारी रात्री अनिकेत, रोहण, अभिषेक, समीर हे चौघे हिवरीनगर परिसरात आले. तिथे ते पार्टी करत होते. यादरम्यान वैभव व त्याचे साथीदारही तेथे आले. वैभवने अनिकेतसोबत वाद घातला. यावेळी वैभव व त्याच्या साथीदारांनी गुप्तीने सपासप वार करत अनिकेतला जखमी करून पसार झाले.
जखमी अनिकेतला इतर मित्रांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी मुख्य आरोपी वैभव बांगडे, सुमित वाघमारे, शोएब, नचिकेत पवार या चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.