नवी दिल्ली – भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राला ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण आता मनिकाला या पराभवानंतर आणखी एक धक्का बसला आहे. टेबल टेनिस महासंघाने तिच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यामुळे तिच्यासमोर आता मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
मनिकाकडून भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या अपेक्षा होत्या. पण मनिकाला अपयश आले व पदकाच्या आशा धुळीला मिळाल्या. मनिका जेव्हा खेळत होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांची मदत घेतली नव्हती. यावेळी तिचे खासगी प्रशिक्षक टोकियोमध्ये दाखल झाले होते. पण त्यांना खेळाच्या ठिकाणी आयोजकांनी प्रवेश दिला नाही. भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक हे सौम्यदीप रॉय आहेत. रॉय हे एकच असे प्रशिक्षक होते की ज्यांना टेबल टेनिसच्या खेळाडूंबरोबर जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
पण मनिका आपले खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांना घेऊन टोकियो येथे गेली होती. पण सन्मय यांना मनिकाबरोबर सराव करण्याची संधी दिली नाही आणि त्याचबरोबर जिथे स्पर्धा होणार होती तिथेही त्यांनी आयोजकांनी प्रवेश नाकारला होता. त्यानंतर मनिकाने स्पर्धा सुरू असताना राष्ट्रीय प्रशिक्षक रॉय यांची मदत नाकारली होती. तीचा हाच अडमुठेपणा व गैरवर्तन आता तिला प्रचंड महागात पडणार आहे.
मनिकाने गैरवर्तन केले आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई होणार आहे. जेव्हा स्पर्धा सुरू होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांची मदत नाकारली खरेतर असे करण्याची गरज नव्हती. त्यांच्याकडून तिने मार्गदर्शन घेणे अपेक्षित होते. येत्या दोन दिवसांमध्ये टेबल टेनिस महासंघाची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये मनिकावर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे महासंघाने सांगितले आहे.