नवी दिल्ली – काही वर्षांपूर्वी दामिनी हा हिंदी चित्रपट फार गाजला होता. त्याहीपेक्षा गाजली होती त्यातील सनी देओल यांची भूमिका. त्यांनी त्यात एका वकिलाची भूमिका केली होती. सदर प्रकरणात न्यायालयाकडून सुनावणीसाठी सातत्याने पुढची तारीख दिली जात असल्यामुळे अर्थात सुनावणी लांबवली जात असल्यामुळे चिडलेला वकिल न्यायालयातच तारीख पे तारीख…तारीख पे तारीख असे रागाने ओरडत आपला हात आपटतो असे काहीसे दृश्य होते.
या भूमिकेसाठी सध्या खासदार असलेल्या सनी देओल यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अगदी नेमका तसाच प्रकार दिल्लीतील एका न्यायालयात 17 जुलै रोजी घडला आहे.
यातील फरक एवढाच या प्रकरणात न्यायालयात तारीख पे तारीख ओरडणारी व्यक्ती नसून स्वत: आरोपी आहे. राकेश कुमार हे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या हवाल्याने या संबंधात देण्यात आलेल्या बातमीत म्हटले आहे की राकेश कुमार याच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र त्याचे हे प्रकरण 2016 पासून न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर सुनावणी होताना पुढची तारीख दिली जात असल्यामुळे तो वैतागला होता. असाच प्रकार 17 जुलै रोजी घडल्यावर त्याने आपला संताप व्यक्त करत न्यायालयातील न्यायाधीशांचा टेबल, संगणक आणि अन्य काही वस्तुंची तोडफोड करत आरडाओरड केली.
या प्रकारानंतर पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतले. मात्र रिल लाइफ आणि रिअल लाइफमध्ये आता फारसा फरक राहीला नसल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.