मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती राज कुंद्रा याला पोलिसांनी काल रात्री अटक केली. अश्लील चित्रपटांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतला असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अगोदरच चार जणांना अटक झाली होती. राजच्या अटकेनंतर आणखी एकाला पकडण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत एक व्हॉटस् ग्रुप असल्याचे समोर आले आहे. एच या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या ग्रुपमध्ये राज कुंद्रा आणि अन्य चौघांचा समावेश होता. अश्लील चित्रपटांच्या कारभाराविषयी या ग्रुपमध्ये चर्चा होत असायची.
आपल्या या काळ्या धंद्याचे मार्केटींग, सेल्स, त्यात सहभागी मॉडेल्सना दिले जाणारे पैसे आदींबाबत राज या ग्रुपवर चर्चा करत असायचा. पोर्नोग्राफीच्या यां धंद्यात सहा जण गुंतल्याची प्राथमिक माहिती आहे. यातल्या चौघांना राजच्या अटकेच्या अगोदरच पकडण्यात आले होते, तर रियान नावाच्या एकाला राजनंतर अटक करण्यात आली आहे.
त्या मुलींचा घेतला गैरफायदा
असे म्हणतात रोज हजारो तरूण आणि तरूणी नायक किंवा नायिका होण्याचे स्वप्न घेउन मुंबई या मायानगरीत दाखल होतात. तर त्यातले 80 टक्के लोक कुठेच काही काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर परतही जातात. मात्र काही जण संघर्ष करत राहतात. ते विविध नायक-नायिका, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संगितकार यांची दारे ठोठावतात. त्यातून एखाद्याचे नशिब फळफळते. अन्य जण मात्र फुटकळ भूमिकांत समाधानी होत संघर्ष करत राहतात तर काही मुली मात्र चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकतात.
राज कुंद्राच्या या काळ्या धंद्यात अशाच नायिका होण्यासाठी मुंबईत आलेल्या मुली अडकल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्या मुलींना मोठ्या चित्रपटांत काम देण्याचे अमिष दाखवत प्रत्यक्षात अश्लील चित्रपटांच्या या दलदलीत त्यांना लोटण्यात आले. दर आठवड्याला एक चित्रपट अशा वेगाने या चित्रपटांची निर्मिती केली जात होती, अशी माहितीही समोर आली आहे.