पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील वीज वाहिन्या जून्या झाल्या आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याने दिवसभर वीज गुल होवून कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.
परीक्षा परिषदेच्या कार्यालयांची दूरवस्था झाली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही काम करणे मुश्किल बनले आहे. जलद कामकाजाच्या दृष्टीने कार्यालयात आवश्यक त्या सोयी-सुविधाच उपलब्ध नसल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. दरवर्षी कार्यालयांची डागडूजीवर खर्च करण्यात येतो. नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा विषयही रखडला आहे.
वीज गायब झाल्याबाबत महावितरणकडे तक्रारही नोंदवली आहे. कर्मचाऱ्यांनी फॉल्ट शोधण्यासाठी मोठी कसरतही केली. डीपी बॉक्समध्येही काही अडचण आहे का, त्याचा शोध घेतला. मात्र, तेथे काहीच अडचण नव्हती. कार्यालयातील काही वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने वीज गेल्याचे उघड झाले. दुरुस्तीचे काम केल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला. दरम्यान, दिवसभर कार्यालयातील संगणकासह इतर सर्वच यंत्रणा कोलमडली होती. दिवसभर पडत असलेला पाऊस व त्यात अंधार यामुळे अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते.
फायर ऑडीटसाठी मुहुर्त सापडेना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयातील वीज वाहिन्या बऱ्याच ठिकाणी लोंबकळत पडलेल्या आहेत. त्यामुळे कार्यालयांचे फायट ऑडीट करण्यासाठी “सीओईपी’ला दीड महिन्यांपूर्वीच पत्र पाठविले आहे. मात्र, त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली आहे. दरम्यान, आता फायर ऑडिट करून घेण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.