बंगलुरू – कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कातील यांचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने त्यातून भाजपमध्ये मोठीच खळबळ उडाली.
या फोन कॉलमध्ये प्रदेश भाजप अध्यक्षांनी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रीपदावरून जाणार असल्याचे विधान केले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे नलिनकुमार यांनी म्हटल्याची बाब यातून समोर आली.
तथापि, नंतर नलिनकुमार यांनी हा आवाज आपला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की माझ्या आवाजात प्रसारीत झालेली ही टेप खोटी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण सरकारकडे करणार आहोत असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
येडियुरप्पा हे भाजपचे मातब्बर नेते असून त्यांच्यामुळेच कर्नाटकात भाजपची पाळेमुळे रूजू शकली व पक्षाला सत्ता मिळू शकली. येडियुरप्पा हे आपला कार्यकाळ निश्चीत पूर्ण करतील अशी सारवासारवही त्यांनी केली. नलिनकुमार यांचे हे फोन संभाषण स्थानिक तुलू भाषेत आहे.
हा आपल्या सारखाच आवाज आहे असे पत्रकारांनी निदर्शनाला आणून दिल्यानंतर ते म्हणाले की यातील नेमके सत्त्य चौकशीतून बाहेर येईल. पक्षाच्या पातळीवर नेतृत्व बदलाची कोणतीही चर्चा झालेली नाही असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.