वॉशिंग्टन – अमेरिकेच्या पूर्व भागात एका रहस्यमय अशा रोगाचा पक्षांना फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचे मृत्यू होत आहेत. हा रोग कोणता आहे याची कोणतीही कल्पना अद्याप संशोधकांनाही नाही. गेल्या काही दिवसात अमेरिकेच्या पूर्व भागात स्टार लिंक ब्ल्यू जेस ग्रेकल्स या जातीतील पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले ही एक प्रकारची पक्षांमधील महामारी असू शकते असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
साल्मोनेला किंवा तत्सम प्रकारच्या विषाणूमुळे पक्षांमध्ये महामारी येऊन त्यांचे मृत्यू होत असतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये पक्ष्यांचे जे मृत्यू आहेत त्या मृत्यूला हे विषाणू जबाबदार नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्व अमेरिकेत व्हर्जिनिया वॉशिंग्टन आणि मेरिलॅन्ड या प्रदेशामध्ये पक्ष्यांचे मृत्यू वाढले. आता डेलवेअर आणि विस्कॉन्सिन या प्रदेशांमध्येही या रोगाचा फैलाव होत आहे.
या रोगामुळे मरण पावलेल्या पक्ष्यांचे पोस्टमॉर्टेम पेनसिल्व्हेनिया युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये करण्यात येत आहे. तरीही या पक्ष्यांचा मृत्यूचे निश्चित कारण समोर आलेले नाही. या रहस्यमय आजारामुळे पक्ष्यांच्या डोळ्यातील चमक आणि शक्ती कमी होत असून त्यांचे दिसण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटत आहे. या आजारामुळे पक्ष्यांना दिशा निश्चित करणेही अवघड होत आहे. त्यांचा दिशेचा अंदाज चुकत आहे तसेच पक्ष्यांमधील थकवा मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक पक्ष्यांमध्ये उडण्याचे ही त्राण राहिलेले नाही.
वैज्ञानिकांच्या मते या रहस्यमय रोगाचा परिणाम थेट मेंदूवर होत असल्यामुळेच पक्ष्यांचा दिशा घेण्याचा अंदाज किंवा दिसण्याची शक्ती कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने सरकारने लोकांना या मृत पक्ष्यांच्या शरीरापासून किंवा जिवंत पक्ष्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.