नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लटानेचे देशात थैमान घातलं. आता दुसरी लाट काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यातच आता करोना प्रतिबंधक लस घेऊनही अनेकांना करोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात आयसीएमआरने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
करोना प्रतिबंधक लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या ज्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ८० टक्के रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आला आहे. एका अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहे. या निष्कर्षांमुळे करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेबाबतचं धोरण ठरविण्यास मदत होणार आहे.
लस घेतलेल्या 677 नागरिकांच्या निरीक्षणातून हा सर्व्हे करण्यात आला आहे. यातील 71 जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती, 604 जणांनी कोव्हिशिल्ड घेतली होती, तर दोघांनी चीनची सिनोफार्म लस घेतली होती. यातील तीन रुग्णांचा मृत्यु झाला, तर इतर रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं निरीक्षण आयसीएमआरनं नोंदवलं आहे.
दिलासादायक म्हणजे, लसीकरणानंतर एखाद्याला डेल्टा व्हेरियंटची लागण झाली, तरी लसींच्या प्रभावामुळे जीवघेणा धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्ट आलं आहे. तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 86.09 टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटने संक्रमित होते.
दरम्यान करोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 9.8 टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण झाली. तर उरलेल्या 90 टक्के रुग्णांना किरकोळ लक्षणं दिसत होती. तर एकूण रुग्णांपैकी 0.4 टक्के नागरिकांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं.