नवी दिल्ली – देशातील करोनाच्या सातीला आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 23,123 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाल्यानंतर आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी पत्रकार परिषदेमध्ये या पॅकेजची माहिती दिली.
या पॅकेजचा अंमलबजावणी पुढील 9 महिन्यात म्हणजे मार्च 2022 पर्यंत केली जाणार आहे, असे मांडवीय यांनी सांगितले.
यापूर्वी सरकारने 15 हजार कोटी रुपांचे पॅकेज दिले होते. देशभरात कोविड रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या उभारणीसाठी हे पॅकेज देण्यात आले होते. कोविडच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या आपत्कालिन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा तयारी पॅकेजचा हा दुसरा टप्पा आहे, असे मांडवीय यांनी सांगितले.
नव्या पॅकेज अंतर्गत केंद्र सरकार 15 हजार कोटी आणि राज्य सरकारे 8 हजार कोटी रुपये देतील. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांमधून देशातील 736 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आणि जिल्हा पातळीवरील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याची योजना राबवण्यात येईल, असेही मांडवीय यांनी सांगितले.
सुमारे 2.4 लाख सर्वसाधारण वैद्यकीय खाटा आणि 20 हजार अतिदक्षता विभागातील खाटा तयार करण्यात यातील. त्यापैकी 20 टक्के खाटा केवळ लहान मुलांसाठी राखीव असतील. या योजनेंतर्गत जिल्हा पातळीवर ऑक्सिजन आणि औषधांसाठीची साठवणूक करण्याची सुविधाही निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कोविडचे तातडीने निदान, प्रतिकार आणि व्यवस्थापन करण्यासाठी तातडीची आरोग्य सुविधांची सज्जता निर्माण करण्याच्या हेतूने या आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बालरोगांसाठी घ्यावयाच्या काळजीचाही त्यामध्ये समावेश असणार आहे, असेही मांडवीय यांनी सांगितले.