वाघोली – महाराष्ट्र विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असून या अधिवेशनात जनतेच्या अनेक विषयावर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना देखील जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विधानसभेतील बारा भाजपच्या आमदारांना निलंबित केल्याने पुणे जिल्हा भाजप कार्यकारणी च्या वतीने हवेली चे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन भाजप पक्षाने निषेध व्यक्त केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.
विविध विषयांवर चर्चा तसेच आरक्षणासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असताना देखील जाणीवपूर्वक भाजपच्या आमदारांना या विषयावर बोलू न दिल्याने याचा जाब संबंधित आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष यांना विचारले असता जाणीवपूर्वक संबंधित 12 आमदारांचे निलंबन करून राज्य सरकारने लोकशाहीची परंपरा मोडीत काढल्याचा प्रकार केला असल्याचे गणेश भेगडे यांनी सांगितले.
हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस अविनाश बवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विधानसभेत विविध विषयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विचार व्यक्त करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याने जिल्हा भाजपच्या कार्यकारणी च्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राज्य सरकार विरोधात निषेध नोंदवण्यात येत आहे.
– दादासाहेब सातव पाटील
(उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजप)