पुणे – महिलेचा विश्वास संपादित करून तिच्याकडून पाच लाख 75 हजार रूपये घेऊन परत न देता तिची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे परत मागितल्याचा राग आल्यामुळे संबंधीत महिलेला आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. ही घटना नाना पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात हलिमा लालसाहेब शेख (वय 26, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सुरेश सुबराव भालेराव (वय 47), सुरेखा सुरेश भालेराव (वय 40) , मयूर सुरेश भालेराव (वय 30 सर्व रा. के. के. वस्ती, सिंहगड रस्ता) व अन्य एक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हलिमा यांची आई आणि आरोपी भालेराव कुटुंबिय यांच्यात ओळख आहे. त्यातूनच भालेराव कुटूंबियांनी हलिमा यांच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यांच्याकडून पाच लाख 75 हजार रूपये घेऊन सहा महिन्यात परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही पैसे देण्यास नकार दिला. पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून भालेराव कुटूंबियांनी हलिमा यांच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी फिर्यादी महिलेने कोर्टात खासगी दावा दाखल केला होता. त्यानुसार कोर्टाने गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस अधिक तपास करत आहेत.