Pune : नव्यांची धडपड अन्‌ जुन्यांचा हिरमोड

- समाविष्ट गावांत कही खुशी कही गम

पुणे (राहुल गणगे) – पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला आठ ते नऊ महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट होणाऱ्या तेवीस गावांमधील भावी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात विविध सामाजिक, राजकीय तसेच विविध कार्यामार्फत जनसंपर्क वाढविण्यासाठी तडाखा सुरू केला आहे.

महापालिकेमध्ये 23 गावे समाविष्ट करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे गावांमधून जिल्हा परिषदेच्या गटातील व पंचायत समिती गणातील गावे कमी झाली आहेत. त्यामुळे एकीकडे नवनिर्वाचितांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे, तर दुसरीकडे गावे गेल्यामुळे काहीजणांचा हिरमोड झाल्याचे चित्र समाविष्ट गावांमध्ये दिसून येत आहे. तर काही सदस्यांनी गावे समाविष्ट होणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, सभा, समारंभावर बंधने असली तरी प्रत्यक्ष गाठीभेटी, मदतीचे वाटप अशा माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कार्यक्रमांचा धडाका चालू असल्याने इच्छुकांमध्ये असलेली चढाओढ पाहून महानगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम आजच वाजू लागले आहेत, असा भास होऊ लागला आहे. परंतु कोण होणार नगरसेवक? हे निवडणुकीनंतरच ठरेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“जिल्हा परिषद गटातील वाघोली हे मोठ्या लोकसंख्येचे गाव पुणे महापालिकेत समाविष्ठ झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना इतर गावांसाठी जास्तीत जास्त निधी वापरणे शक्‍य आहे. वाघोलीतील समस्या सोडविण्यासाठी जास्तीत जास्त निधीची गरज असल्याने गावांचा समावेश झाला आहे. आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव निधी मिळवण्यासाठी कार्य करणार आहे.”
-राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच वाघोली

“उत्तमनगर शिवणे जिल्हा परिषद गटातील कोंढवे आणि कोपरे ही दोन गावे विलीन झाली आहेत. अगोदर शिवणे आणि उत्तमनगर गावांचा समावेश झाला होता. ही चारही गावे एकमेकांना लागून असल्यामुळे हद्दीच्या वादात अनेक कामे करूनही काही कामे रखडत होती.
तरीही कोंढवे आणि कोपरे गावांत जिल्हा परिषदेच्या निधीतून आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. महानगरपालिकेत विलीन झाल्यानंतर देखील मंजूर झालेली कामे, चालू असलेली या गावांमधील विकासकामे पूर्ण होतील आणि ती करून घेण्याची जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.”
– अनिता इंगळे, जिल्हा परिषद सदस्य

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.