हिमांशू
“अति तिथं माती’ आणि “अति झालं; हसू आलं’ या दोन म्हणी अतिरेकाच्या संदर्भानं आम्हाला ठाऊक आहेत. परंतु जेव्हा अतिरेकाचाही अतिरेक होईल; पण मातीही होणार नाही आणि हसूही येणार नाही, अशा अवस्थेत काय करावं, हे आजवर कुणीच सांगितलेलं नाही. “अति सर्वत्र वर्ज्यते’ असं आपल्याला शिकवलं गेलंय; परंतु पेट्रोल पंपावर खिशात हात घालताना हे सुभाषित कुणाला ऐकवायचं हेच समजत नाही. काहीजण म्हणतात केंद्र सरकारला ऐकवा तर काहीजणांच्या मते हे राज्य सरकारला सुनावलं पाहिजे.
मध्यंतरी आकडेमोड केलेला एक मेसेजसुद्धा व्हॉट्सऍपवरून मिळाला होता. पेट्रोल आणि डीझेलवर राज्यांचे कर अधिक आहेत की केंद्राचे, हे “पुराव्यासह’ दाखवून देणारा हा मेसेज होता; पण आम्ही “गुगल’ करून बघितलं तेव्हा निराळीच आकडेवारी मिळाली. असो, पेट्रोल आणि डीझेलचे दर जसे “अति’ म्हणण्याच्याही पलीकडं गेलेत, तसेच ते कुणामुळे वाढताहेत यावरील चर्चाही “अति’च झालीय. एका पठ्ठ्यानं परवा आम्हाला गॅस सिलिंडरच्या दराबद्दलही असाच चमत्कारिक युक्तिवाद ऐकवला. सिलिंडरवाल्याला सव्वाआठशे रुपये देताना आम्हाला घाम फुटल्याचं पाहून तो म्हणाला, “”दर वाढलेत हे खरं; पण हे पैसे किती सत्कारणी लागताहेत, हेही पाहा ना! सारखा-सारखा कसला विरोध करता बुवा तुम्ही?” असल्या युक्तिवादावर एकच उपाय असतो- संबंधिताकडे भूतदयेने पाहणं!
खरं तर असे युक्तिवाद करणाऱ्यांकडे आम्ही आश्चर्याने पाहणं आणि संबंधिताने आमच्याकडे भूतदयेने पाहणं अपेक्षित आहे. ज्याच्याकडे पैसे मोजण्याची इच्छा आहे; पण ते शक्य नाही असे लोकच भूतदयेस पात्र ठरतात ना? आम्हाला सिलिंडर परवडेनासा झालाय आणि पेट्रोल भरतानाही छातीत धडधडतं ही गोष्ट सोळा आणे खरी आहे. त्रास होतोय; पण दिसू द्यायचा नाही, असा अभिनय आम्हाला जमणे नाही.
पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मंगळवारी झालेली वाढ ही एकाच महिन्यातली सोळावी वाढ ठरली. पेट्रोलच्या दरात 35 पैसे वाढ झाली तर डीझेल 28 पैशांनी महागलं. इंधन दरवाढीचा हा चटका करोनाच्या काळात उत्पन्न घटलेल्या लोकांसाठी किती तीव्र स्वरूपाचा आहे ते “जावे त्यांच्या वंशा’ तेव्हाच कळेल! परंतु तरीही वेगवेगळे युक्तिवाद सतत ऐकावे लागत असल्यामुळे पेट्रोल, डीझेल आणि गॅसचे दर “अति’ झाले असे कधी समजायचं, हेच कुणाला कळेनासं झालंय.
एक भाकित असंही आहे की, इंधनासाठी जास्तीत जास्त पैसे मोजण्याची सवय लोकांना लावली जाईल आणि नंतर ते जीएसटीच्या कक्षेत आणलं जाईल. या भाकितानुसार पेट्रोल “डबल सेंच्युरी’ ठोकू शकेल. हे ऐकून आमचं ब्लडप्रेशर वाढलं, हे वेगळं सांगायला नको!
अर्थातच, पेट्रोलियम पदार्थांच्या दरांबाबत जे “सोशल युक्तिवाद’ ऐकू येतात त्यामुळे घटकाभर करमणूक होते आणि हृदयविकाराचा धोका काही क्षणांनी का होईना पुढे ढकलला जातो, हे खरं. अति झालं म्हणून हसू आलं नाही तरी हे भन्नाट युक्तिवाद ऐकून नक्की हसू येतं. असाच एक युक्तिवाद आमच्या परममित्राने परवा केला. म्हणाला, “”आपण पेट्रोलची वाहनं सोडून इलेक्ट्रिक वाहनं वापरावीत आणि प्रदूषण संपावं, अशा उदात्त हेतूनं दरवाढ होतेय…” आता बोला!