वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे येत्या 25 तारखेला व्हाईट हाऊस मध्ये अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी अफगाणिस्तान प्रश्नावर चर्चा करणार आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपले सैन्य माघारी घेतल्यानंतर तेथे उद्भवणाऱ्या स्थितीविषयी दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने चर्चा होणे अपेक्षित आहे.
अफगाणिस्तानातील नॅशनल रिकॉन्सिलिएशन कौन्सिलचे प्रमुख डॉ अब्दुल्ला अब्दुल्ला हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. युद्धाच्या स्थितीनंतर अफगाणिस्तानची स्थिती बरीच मोडकळीला आली असून अमेरिकेने तेथून आपला काढता पाय घेतला असला तरी आम्ही अफगाणिस्तानला आर्थिक आणि मानवतावादी भूमिकेतून मदत करीतच राहणार आहोत असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हा देश पुन्हा दहशतवाद्यांच्या ताब्यात जाता कामा नये याची दक्षताही आम्ही घेणार आहोत असे या प्रवक्त्यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने दोन्ही नेत्यांच्या या बैठकीला महत्व दिले जात आहे. अफगाणिस्तानातील संघर्ष मिटवण्यासाठी तेथील सरकार आणि दहशतवादी गट विशेषत: तालिबानशी शांतता चर्चा सुरू आहे. या चर्चेला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही अमेरिकेकडून केला जात आहे.