- वीस जणांवर कारवाई
- 10 हजार दंड वसूल
पवनानगर – करोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्यण घेतला. यामुळे नागरिकांनी बाजरपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. तर येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह सहा जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पवनानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात रुग्णसंख्या अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण झाले आहे. लोणावळा शहरासह पवनानगरमध्ये देखील रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काले ग्रामपंचायतीकडून विनाकारण बाहेर पडलेल्या 72 जणांच्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये पवनानगर बाजारपेठेतले एकूण 10 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे पवन मावळच्या 40 गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या पवनमावळ परिसरात करोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. तर येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, सहा कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. दुसरी लाट संपत असता व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असताना अचानक रुग्ण संख्या वाढल्याने पवनानगर परिसरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करोना लसीकरण सुरू आहे. यामुळे अनेक जण येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले असल्याने तसेच पवनानगरच्या मुख्य बाजारपेठेतील 10 रुग्ण सापडल्याने किती लोकांना यांचा संसर्ग झाला असेल याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांवर कडक कारवाई करा
वैद्यकीय विभागाकडून तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. सध्या मावळात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात पवनमावळ परिसरामध्ये पवना धरण, तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर ही पर्यटनस्थळे आहेत. पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी असताना पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे निर्बंध झुगारून येणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नियमांचे उल्लंघन करणारांना दंड
पवनानगर बाजारपेठेत 10 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, विनामास्क फिरणाऱ्या वीस जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई पोलीस नाईक संतोष शेळके, विजय गाले यांनी केली आहे.
नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊन देखील त्यांना देखील करोनाची लागण झाली आहे. तेव्हा नागरिकांनी बिनधास्त फिरणे टाळावे. मास्क व सॅनिटाझरचा वापर करावा.
– डॉ. राजेंद्र मोहिते, वैद्यकीय अधिकारी