समाजवादी व मार्क्सवादी कम्युनिस्ट यांची आघाडी?
मुंबई, ता. 17 – पर्यायी सरकार स्थापण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर समाजवादी पक्ष “कार्यक्रमावर आधारित’ युती करेल, असे पक्षाचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांनी जाहीर केले आहे.
पुढील सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होईल असा फर्नांडिस यांचा अंदाज आहे व त्या संदर्भात त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, मी व मधु लिमये लवकरच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बी. टी. रणदिवे यांना भेटू व युतीसंबंधी कार्यक्रम ठरवू.
पक्ष्यांचा संरक्षणाचा करार
टोकियो – रशिया व जपान या दोन देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या 287 जातींच्या पक्ष्यांचे संरक्षण करण्याचे दोन्ही देशांच्या सरकारांनी ठरविले आहे. या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोन्ही देशांतील तज्ज्ञांची 3 दिवस बैठक भरली आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे पाणसुरुंग
लंडन – इंग्लंडच्या दक्षिणेकडील प्लोकस्टोन येथून निघालेल्या बोटीच्या कप्तानास दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे जिवंत पाणसुरुंग सापडले. ते 6 टन आहेत. ते पाणसुरुंग बोटीच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात मिळाले.
अंड्याच्या कवचाचा नवा उपयोग!
लंडन – असबेस्टॉस, दगड, विटा व ऍल्युमिनियम स्वच्छ करण्यासाठी ब्लास्ट क्लीनिंग अब्रेझिव्ह म्हणून उंड्याच्या कवचाचा चांगला उपयोग होऊ शकेल, असे ब्रिटनच्या पेंट रिसर्च असोसिएशनला आढळून आले आहे.
प्रयोगशाळेत अंड्याच्या कवचाची खरखरीत वाळू इतकी बारीक पुड करून तिचा जोराचा झोत सोडून वरील पदार्थ जलदगतीने व सहजपणे स्वच्छ झाल्याचे सिद्ध करण्यात आले. या कवचाचे कण टणक व टोकदार असले तरी ते पदार्थांची हानी करण्याइतके कडक नाहीत व त्यापासून आरोग्यालाही अपाय पोचू शकत नाही.