पुणे : महापालिकेकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना भूल देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून लस मागविण्यात येणार आहे. हे डोस आयात करण्यास महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी सव्वा लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात ६२ प्रजातीचे सुमारे ४२५ वन्यप्राणी असून यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी यांचा समावेश होतो. विविध प्रजातींच्या प्राण्यांना वेळोवेळी आजाराचे निदान करणेसाठी विविध चाचण्या, उपचार करणे, एका खंदकातून दुसरीकडे प्राणी स्थलांतरीत करणे, इतर प्राणीसंग्रहालयासमवेत प्राणी अदलाबदल करणे इत्यादीसाठी भूल द्यावी लागते. बधिरीकरण प्रक्रियेसाठी विशिष्ट ड्रग्जचा प्रजातीनिहाय वापर केला जातो. Xylazine व Ketamine ड्रग्ज बहुतांश प्रजातीत परिणामकारक असलेने मोठ्या प्रमाणावर या ड्रग्जचा वापर आजतागायत करणेत आलेला आहे.
तथापी काही प्रजाती जसे कि गवा व हत्ती या प्रजातीत या ड्रग्जचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. तथापी या दोन प्रजातीतील प्राणी प्राणीसंग्रहालयात आहेत. यास्तव अशा प्रजातीतील प्राण्यांना बधिरीकरण करणेसाठी ‘नार्कोटीक’ वर्गातील Etorphine Hydrochloride या ड्रग्जचा वापर करावा लागतो. हे ड्रग सद्यस्थितीत राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाकडे उपलब्ध नाही. भारतात हे ड्रग उपलब्ध नसलेने आजतागायत ते खरेदी करणेत आले नाही. अलिकडच्या काळात प्राणीसंग्रहालयातील आजारी गव्यावर उपचार करणेकरिता अन्य राज्यातून हे ड्रग मागविणेत आले होते. तथापी ती सहजासहजी उपलब्ध होऊ शकली नाही.
गवा व हत्ती यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रजातींना बधिरीकरण प्रक्रियेसाठी Etorphine Hydrochloride व या ड्रगचे अॅन्टीगोनीस्ट Diprinorphine Hydrochloride व Naltrexone Hydrochloride ही तीन प्रकारातील औषधे आवश्यक तेवढ्या मात्रेत खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. ही औषधे भारतात कोठेही उपलब्ध नाहीत. या औषधांच्या उपलब्धेबाबत भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांचेकडून माहिती घेतली असता ‘वाईल्डलाईफ फार्मास्युटीकल्स’ दक्षिण आफ्रिका यांचेकडून या ड्रग्जचा पुरवठा केला जाऊ शकतो याबाबत माहिती प्राप्त झालेली आहे.
‘वाईल्डलाईफ फार्मास्युटीकल्स’ दक्षिण आफ्रिका यांचेकडे ई-मेलद्वारे संपर्क करून या औषधांच्या खरेदीबाबत विचारणा करून खरेदी प्रक्रियेची इंत्यभूत माहिती प्राप्त केलेली आहे. कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार आयात प्रक्रियेतील सर्व परवानग्या व सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर त्यांना अगोदर औषधांचे देयक अदा करावे लागणार आहे व तदनंतर मालाची पोहोच केली जाणार आहे.