पुणे – उरवडे (ता. मुळशी) येथ सॅनिटायझर बनवणाऱ्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला सोमवारी (दि. 7) दुपारी भीषण आग लागली. यात अंदाजे 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 18 कामगारांचे मृतदेह मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या घटनेवरून मुळशी पॅटर्न फेम अभिनेते प्रविण तरडे यांनी संताप व्यक्त केला.
अभिनेते प्रविण तरडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. कंपनीची छोटीशा जागा पाहून तरडे यांनी संताप व्यक्त करत सर्व नागरिक, सरपंचांनी इतर कंपन्यांना भेटी देऊन पाहणी करण्याचं आवाहन केलं.
प्रविण तरडे म्हणाले, “आपण एक काम करू आता जर आपली आई, बहिण, भाऊ, नवरा, बायको ज्या कंपनीत काम करत असतील तर त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहू द्या. मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला मी विनंती करतो की कंपन्यांच्या आत जा आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करत आहेत. नाहीतर असेच जळून मरतील महिन्याभरानी, वर्षांनी आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का ? असा सवाल तरडे यांनी उपस्थित केला.
प्रविण तरडे पुढे म्हणाले, तर प्राज इंडस्ट्रीजमध्ये मी 3 वर्षे मी कामाला होतो. या कंपन्यांचं फॅक्ट्री ले आऊट चांगलं आहे मग त्यांच्या शेजारी लागून असलेल्या कंपन्यांत ही व्यवस्था का नाही. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 38 माणसं काम करतात का कधी ? 40 बाय 40च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 38 माणसं कामाला.
Video : मुळशीतील आगीच्या दुर्घटनेनंतर प्रविण तरडे संतापले #PuneFire pic.twitter.com/6ZV8H0pQtB
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) June 8, 2021
तक्रार कोणाचीही नाही, जबाबदारी लोकांची आहे. प्रशासनावर, शासनावर अवलंबून राहू नका. आपले नातेवाईक तिथं काम करतात ना? आता आपली जबाबदारी आहे… आपण आतमध्ये जायचं कंपनीच्या आणि आपले आई-बाप कसे काम करतात ते पाहा. तालुक्यातील पोरांनी आपली रग आपल्या आई-बापांसाठी दाखवा. कंपन्यांच्या आत जाऊन पाहा. आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या चांगल्या दर्जाच्या आहेत तिथे या छोट्या-छोट्या कंपन्यांच्या मालकांना न्या आणि दाखवा, असंही प्रविण तरडेंनी म्हटलं आहे.