प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलमध्ये अडचणी; अर्थमंत्र्यांची थेट इन्फोसिस कंपनीला सूचना

नवी दिल्ली – प्राप्तिकरदात्यांना लवकर ई- फायलिंग करता यावे याकरिता इन्फोसिस कंपनीने तयार केलेले ई-फायलिंग पोर्टल काही तासापूर्वी सुरू करण्यात आले. मात्र या पोर्टलवरून ई-फायलिंग करताना प्राप्तिकर दात्यांना अनेक अडचणी येऊ लागल्या.

याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची तात्काळ दखल घेतली. पोर्टल मधील अडथळे दूर करून लवकर पोर्टल्स सुरू करावे अशी सूचना सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीला केली.

सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांना या पोर्टल मधील तांत्रिक अडचणी शक्‍य तितक्‍या लवकर दूर कराव्यात असे सांगितले आहे.

2019 मध्ये प्राप्तीकर विभागाने पोर्टलमधील मूल्यवर्धनाचे काम इन्फोसिस कंपनीला दिले होते. अगोदर विवरणासाठी 63 दिवसाचा कालावधी लागत होता. तो एक दिवसावर आणण्याचा यामागे उद्देश होता. त्याचबरोबर कर परतावा लवकर मिळावा याकरिता हे पोर्टल विकसित करण्यात आले होते.

याकरिता जुने पोर्टल गेल्या आठवड्यात बंद करण्यात आले होते. काल रात्री बराच गाजावाजा करून हे पोर्टल सुरू करण्यात आले. सोमवारी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी हे पोर्टल सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी सीतारामन यांनी ट्‌विटरवर या पोर्टलमुळे प्राप्तिकर दात्यांना काहीही अडचण न होता वेगात विवरण भरता येईल असे सांगितले होते.

पण लगेच ट्‌विटरवर करदात्यांनी या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले. माझ्याकडे या पोर्टल संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. इन्फोसिस व नंदन निलेकणी याची गंभीर दखल घेऊन या अडचणी शक्‍य तितक्‍या लवकर दूर करतील असे सीतारामन यांनी सांगितले.

भारतात उद्योग धंदा करणे सुलभ व्हावे याकरिता सरकारने मोहीम राबविली आहे. याचाच एक भाग म्हणून हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. इन्फोसिसने जीएसटी नेटवर्क उभारले आहे. या नेटवर्कच्या कामकाजावेळीही सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या होत्या व इन्फोसिस कंपनीला टीकेचा भडिमार सहन करावा लागला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.