नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी मंगळवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 23 पैशांची, तर डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ केली. चालू महिन्यात आतापर्यंत दोन्ही इंधनांच्या दरांत 13 वेळा वाढ झाली. त्यामुळे मेमध्ये पेट्रोल 3 रुपये 4 पैशांनी, तर डिझेल 3 रुपये 59 पैशांनी महागले.
इंधन दरवाढीच्या सत्रामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांत पेट्रोल दराने याआधीच 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आता मुंबईतही पेट्रोल (99 रुपये 71 पैसे) शंभरीजवळ जाऊन ठेपले आहे. मुंबईत डिझेलचा दर 91 रुपये 57 पैशांवर पोहोचला आहे. दिल्लीत ते दर अनुक्रमे 93.44 रुपये आणि 84.32 रुपये इतके आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात दोन्ही इंधनांचे दर सर्वाधिक आहेत.
त्या जिल्ह्यात प्रतिलिटर पेट्रोलसाठी 104.42 रुपये, तर डिझेलसाठी 97.18 रुपये मोजावे लागत आहेत. बंगाल निवडणुकीच्या काळात सार्वजनिक कंपन्यांनी 18 दिवस दरवाढ केली नाही. त्या विश्रामानंतर 4 मे या दिवशी दरवाढ करण्यात आली. तेव्हापासून दरवाढीचे सत्र कायम आहे.