पुणे,दि.19- पान टपरी चालकाने मोफत सिगरेट न दिल्याने त्याचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर त्याच्या घरावर पेटते पेट्रोलचे बोळे टाकून घर पेटवण्याचाही प्रयत्न केला गेला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तीघा सराईत गुन्हेगारांवर खूनाच्या प्रयत्नाचा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोमण आरिफ सय्यद, आत्तु झहुर अंन्सारी आणी मोठा पणती उर्फ रिझवान अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरिफ सय्यद (33,रा.चिंतामणीनगर, हांडेवाडी, हडपसर) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार , आरिफच्या वडिलांचे पानटपरीचे लोखंडी बॉक्स आहे. आरोपींनी सोमवारी रात्री बॉक्सवर दगडफेक करुन शिवीगाळ करत सिगरेटची मागणी केली. लॉकडाऊनमुळे पानटपरी बंद असून सिगरेटचे पाकिट नसल्याचे आरिफच्या वडिलांनी सांगितले. यावर राग मनात येऊन आरोपींनी आरिफच्या वडिलांना ” साले बुढे हमको सिगरेट नही देता’ असे म्हणत त्यांचा गळा दाबला. यामुळे ते बेशुध्द होऊन खाली पडले. त्यांना व आईला घेऊन आरिफ रुग्णालयात गेला. तेव्हा दहशत पसरवत आरोपींनी आरिफच्या घरावर पेट्रोलचे जळते बोळे टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरिफच्या घरात त्याची पत्नी व लहान मुले होती. मात्र फक्त पडदा जळाला, पावसामुळे घराला आग लागली नाही. आरिफ वडिलांना रुग्णालयातून घेऊन आल्यानंतर घराबाहेर थांबला होता. यावेळी आरोपींनी ” साले जादा हिरोगिरी मत कर, तेरे पिछे पुरा परिवार है, चल अब मुझे रोज सिगरेट मोफत देना पडेगा नही तो काट दुंगा”, अशी धमकी देत कोयता हवेत फिरवला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वरपडे करत आहेत.