मेरठ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः मृत्यूचा तांडव सुरु केला आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण दगावत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. शहरातील ग्रेगरी रेमंड राफेल यांनी त्यांच्या तरुण जुळ्या मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राफेल कुटुंबातील २ तरुण मुलांच्या अचानक जाण्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैव म्हणजे या दोघांचा जन्म एकत्र झाला आणि मृत्यूही एकाच दिवशी झाला. नुकतेच त्या दोघांनी आपला २४ वा बर्थ डे साजरा केला होता.
या दोघांचे नाव जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी असं आहे. दोघांनी एकत्र कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले होते. हैदराबादमधील एकाच कंपनीत दोघे नोकरीला होते. वडील रेमंड यांनी सांगितले की, ‘माझ्या मुलांना २४ एप्रिलला खूप ताप आला. कोरोना संक्रमित झाल्यामुळे दोघांचा मागच्या आठवड्यात १३ आणि १४ मे रोजी मृत्यू झाला.’
मेरठ येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या घराचा परिसर कंन्टेंन्मेंट झोन घोषित केला होता. त्यावेळी रेमंड त्यांच्या दोन्ही मुलांवर घरीच उपचार करत होते. त्यांना वाटलं की, दोघांचा ताप बरा होईल. परंतु तसं झालं नाही. पण जेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली जायला लागली तेव्हा डॉक्टरांनी दोघांना हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला.
१ मे रोजी या दोघांनाही खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु काही दिवसांच्या उपचारानंतर दुसरा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आला.
डॉक्टरांनी या दोघांना कोरोना वार्डातून सामान्य ICU रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. १३ एप्रिल जोफ्रेडचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसरा मुलानेही अखेरचा श्वास घेतला. दोन तरुण मुलांना गमावल्यानं ग्रेगरी रेमंड यांना दु:ख अनावर झालं. शिक्षक असल्याने मी माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी खूप संघर्ष केला होता. मृत्यूपूर्वी हे दोघंही कोरियाला जाण्याची प्लॅनिंग करत होते. त्याचसोबत कामासाठी जर्मनीलाही जायचं होतं. पण माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करून देव मला एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नाही अशी हतबल प्रतिक्रिया या मुलांच्या वडिलांनी दिली.