लखनौ, – संरक्षण विभागाच्या संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने म्हणजेच डीआरडीओने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात साडे सातशे खाटांचे रुग्णालय उभे केले आहे. ते रूग्णालय आज पासून कोविड रुग्णांच्या सेवेत उपलब्ध झाले आहे.
बनारस हिंदु विद्यपीठाच्या आवारात हे कोविड रुग्णालय उभे राहिले आहे. तेथे 250 आयसीयु बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तेथे पुरेसा ऑक्सिजन साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे रुग्णांना मोफत भोजन व औषधे दिली जाणार आहेत. येथे रूग्णांना थेट प्रवेश मात्र मिळणार नाही. तेथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून परवानगी घेऊनच रुग्णांना येथे प्रवेश दिला जाईल. हा नियंत्रण कक्ष मात्र राज्य सरकारमार्फत उभारण्यात आला आहे. येथील वैद्यकीय स्टाफ लष्कराने पुरवला आहे. या रुग्णालयासाठीच्या पायाभूत सुविधा राज्य सरकारने पुरवल्या आहेत. डीआरडीओने दिल्ली, अहमदाबाद, लखनौ आणि आता वाराणसीत ही रुग्णालये कार्यान्वित केली आहेत.