नवी दिल्ली, दि.10 -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सोमवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 26 पैशांची, तर डिझेलच्या दरात 33 पैशांची वाढ केली. त्यामुळे राजस्थान आणि मध्यप्रदेश पाठोपाठ पेट्रोल दराची शंभरी ओलांडणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य ठरले.
सार्वजनिक कंपन्यांनी 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पाचव्यांदा वाढ केली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. दरवाढीच्या सत्रामुळे आठवडाभरात पेट्रोल 1 रूपया 14 पैशांनी, तर डिझेल 1 रूपया 33 पैशांनी महागले. राजस्थान आणि मध्यप्रदेशात काही ठिकाणी याआधीच पेट्रोल दराने 100 रूपयांचा टप्पा ओलांडला. आता महाराष्ट्रातील परभणीत पेट्रोल प्रतिलिटर 100 रूपये 20 पैसे इतके झाले आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली. तेव्हापासून वर्षभरात दोन्ही इंधने सुमारे 20 रूपयांनी महागली. दरम्यान, ताज्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रालचा दर 91 रूपये 53 पैसे, तर डिझेलचा दर 82 रूपये 06 पैसे इतका झाला आहे. मुंबईत ते दर अनुक्रमे 97 रूपये 86 पैसे आणि 89 रूपये 17 पैशांवर पोहचले आहेत.