पुणे – पौड पोलिस ठाण्यातील आकस्मिक मृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केले आहे अशी तक्रार न देण्यासाठी पैशाची मागणी करणार्या मृताच्या मेव्हण्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी आरोपीचे दाजी कैलास मराठे यांच्या आत्महत्ये प्रकरणात पौड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सुधीर पद्माकर कुलकर्णी (६१, रा. करिष्मा सोसायटी, कोथरूड,पुणे) यांनी फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास मराठे हे सुधील कुलकर्णी यांच्याकडे कामाला होते. परंतु, दरम्यानच्या काळात मराठे यांनी आत्महत्या केली. दरम्यान, आकस्मात मृत्यूची चौकशी सुरू असताना कुलकर्णी यांनी मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार न देण्यासाठी राहुल जाधव हा कुलकर्णी यांच्याकडे पैसे मागत असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके यांनी सांगितले.