आंबेगाव बुद्रुक -घरी उपचार घेणाऱ्या करोना मृतांवर गेल्या दोन महिन्यांपासून नागरिक शेतकरी संघ अंत्यसंस्कार करत आहे. दरम्यान, संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी सोमवारी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेताच या सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे.
मोरे यांनी सोमवारी धायरी येथील लायगुडे हॉस्पिटल येथे लस घेतली. त्यानंतर त्यांना पुणे महापालिका कॉलसेंटर येथून फोन आला, की वडगाव आनंदनगर येथील एका हॉस्पिटलबाहेर ऍम्ब्युलन्समध्ये करोनाबाधिताचा मृतदेह आहे. यावर मोरे यांनी तातडीने सहकारी दीपक चौघुले यांच्यासह घटनास्थळी पोचून शासनाच्या नियमाचे पालन करूण मृतदेह पॅक केला आणि पुढील प्रक्रिया पार पाडली.
मोरे हे गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक कार्य करत असून, आतापर्यंत त्यांनी 4,035 करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करोना काळात शेकडो कुटुंबातील सदस्यांना किराणा साहित्यदेखील दिले आहे.