मंगळसूत्र गहाण ठेवत पतीसाठी प्लाझ्मा खरेदी

पिंपरी  -करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा महत्त्वाचा ठरत आहे. प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा शोधण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. भोसरीमध्ये अक्षरशः एका महिलेने आपल्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा खरेदीसाठी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून चक्क सोळा हजार रुपयांमध्ये प्लाझ्मा खरेदी केला आहे. प्लाझ्मासाठी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणे ही चीड आणणारी घटना भोसरीमध्ये उघडकीस आली आहे. यामुळे रेमडेसिविर व ऑक्‍सिजन यांच्यावर प्रशासकीय बंधने आल्यानंतर काही समाजकंटकांनी आपला मोर्चा प्लाझ्माकडे वळविल्याचे दिसते.

भोसरीतील एका महिलेने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर घडलेला प्रसंग सांगितला. करोना उपचारासाठी आपल्या पतीला दवाखान्यात दाखल केले होते. दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती बघून डॉक्‍टरांनी रुग्णाला प्लाझ्मा देण्याचे सांगितले. त्यामुळे प्लाझ्मा मिळविण्यासाठी या महिलेची धावपळ सुरू झाली. शहरातील प्रत्येक रक्त पेढी पालथी घालूनही प्लाझ्मा काही केल्या मिळेना.

नेमकी हिच वेळ साधत प्लाझ्माच्या शोधात भोसरी येथील रक्तपेढीत आलेल्या महिलेची भेट एजंटशी पडली. एजंटनी या महिलेला विश्‍वासात घेऊन माझ्याकडे डोनर आहे व मी तुम्हाला प्लाझ्मा मिळवून देऊ शकतो. मात्र, प्लाझ्मासाठी 16 हजार रुपये मोजावे लागतील. किंमत ऐकून महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली.

आतापर्यंत उपचारासाठी होत असलेला खर्च नाकीनऊ आला असताना एवढी रक्कम उभी करण्याचे मोठे आव्हान या महिलेपुढे उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता ही महिला माघारी जाऊन मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे घेऊन आली व प्लाझ्मा घेऊन गेली.

मात्र, प्लाझ्मा मिळाल्यावर सुद्धा त्यांच्या पतीचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित त्या कथित एजंट मुलावर गुन्हा दाखल करण्याचा सल्ला मला अनेकांनी दिला; पण आता माझा आधार गेल्याने मला तक्रार करायच्या भानगडीत पडायचे नाही. मात्र, अशा संकटाच्यावेळी परिस्थितीचा फायदा घेणाऱ्यांनी एकदातरी आपले कुटुंब आठवावे, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अव्वाच्या सव्वा दराने प्लाझ्मा विक्री
अव्वाच्या सव्वा किमतीत प्लाझ्मा विकणाऱ्यांचे प्रकार यशवंतराव चव्हाण रक्तपेढीतसुद्धा घडल्याचे समजते. यावरून शहरात प्लाझ्मा विकणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याचे वृत्त आहे. प्रत्येक रक्तपेढीत प्लाझ्मा दाते घेऊन हे एजंट सावज शोधाण्याच्या शोधात असतात. प्लाझ्मा दात्यांचेसुद्धा सहा हजार रुपये कमिशन असल्याची खात्रीलायक माहिती आहे. झालेल्या या प्रकारासंदर्भात घटना घडलेल्या रक्तपेढीत जाऊन आम्ही सर्व माहिती घेतली असता, त्यांनी घटनेला दुजोरा दिला. मात्र या प्रकरणाशी रक्तपेढीचा संबंध नसून आम्ही प्लाझ्मा दाता घेऊन त्या रक्त गटाचा प्लाझ्मा सरकारी किमतीने ग्राहकाला देत आहोत, असे सांगितले.

उपाययोजना गरजेची
रक्तपेढीची आजची परिस्थिती बघितली, तर रक्त पेढीबाहेर गर्दी मावत नाही. प्लाझ्मासाठी झालेली गर्दी, सोबत प्रत्येकानी आणलेले डोनर यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. यामुळे नेमके रुग्णांना प्लाझ्मा जातोय की एजंटकडे यांचे गणित अजिबात जुळत नाही. त्यामुळे अशा घटनेला बळ मिळते. रक्त पेढीनींसुद्धा आपली पत व प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.