कोलकाता – प. बंगालमध्ये करोना संक्रमणामुळे तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र, आता सिन्हा यांच्या पत्नीने बुधवारी पोलिसांत हत्येची तक्रार नोंदवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काजल सिन्हा हे उत्तर 24 परगना जिल्ह्याच्या खडदह विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काजल सिन्हा हे करोना संक्रमित आढळले होते तर 25 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले.
काजल सिन्हा यांच्या पत्नी नंदिता सिन्हा यांनी खडदह पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंदवली आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी करोना विषाणूचं संक्रमणाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरले आणि त्याचमुळे काजल सिन्हा यांचा मृत्यू झाला, असा आरोप नंदिता सिन्हा यांनी केला आहे.