सातारा : जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे आणखी 26 हजार डोस उपलब्ध झाले असून गुरुवारी जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम पुन्हा पूर्ववत होणार आहे. बुधवारी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला ब्रेक मिळाला होता.
जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण गतीने राबवण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले. मात्र, सद्य परिस्थितीत लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. सोमवारी जिल्ह्यासाठी 43 हजार लस उपलब्ध झाली. मंगळवारी दुपारीच लसीचा साठा संपला. मात्र, मागणी करुनही लस उपलब्ध न झाल्याने बुधवारी लसीकरण मोहिमेस ब्रेक बसला. बुधवारी रात्री उशिरा कोविशिल्ड लसीचे 26 हजार डोस उपलब्ध झाले असून गुरुवारपासून लसीकरणाची मोहीम पूर्ववत सुरु होणार असल्याची माहिती डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली.
दरम्यान दि. 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस पुरवण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेत व्यत्यय येत आहे. कोविशिल्डबरोबरच कोव्हॅक्सिन लसही मागवण्यात येत आहे.