पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या दृष्टीने व त्यांना विविध विभाग व पदांच्या कामकाजाची माहिती व्हावी यासाठी विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेण्यात येत असते. गेल्या 4 वर्षात काहींना काही अडथळ्यांमुळे या परीक्षाच घेण्यात आल्या नव्हत्या. या परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
22 ते 24 एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्यात करोनाने कहर केला असून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. या परीक्षेला 260 कर्मचारी बसणार होते. ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा होणार होत्या. आता करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत .