बीजिंग – चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्सने ट्विट करत भारताने सर्वाधिक करोना रुग्णांचा विक्रम मोडल्याची माहिती देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी भारताला मदतीचा हात पुढे करत असतानाच भारतीय नागरिक लवकरच करोनाला पराभूत करतील, असा विश्वास व्यक्त केला.
भारताने 3 लाख 46 हजार रुग्णांच्या नोंदीसह प्रतिदिन करोना रुग्णांच्या आकड्याचा जागतिक विक्रम मोडला आहे. या काळात भारतात करोना लस, ऑक्सिजन आणि बेड्सचीही कमतरता आहे. या कठीण परिस्थितीची चीनने नोंद घेतलीय. या संकटाच्या काळात चीनला भारताला मदतीचा हात देण्याची इच्छा आहे. तात्पुरत्या साथीरोगाच्या विरोधातील वैद्यकीय साहित्याच्या तुटवड्यावर उपाययोजना म्हणून आम्ही भारताला मदतीसाठी तयार आहोत.
आम्ही भारतातील करोना नियंत्रणासाठी देखील सहकार्य करु. चीनची प्रामाणिक सहानुभुती भारतासोबत आहे. करोना विरुद्धच्या लढाईत चीनचं सरकार आणि नागरिक भारताच्या सरकार आणि नागरिकांसोबत आहेत.
दरम्यान, चीनने अमेरिकेला भारतात कोरोनाचं संकट आलेलं असताना करोना लसीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर लावलेल्या निर्बंधावरुन लक्ष्य केले. ग्लोबल टाइम्सने एक कार्टून प्रकाशित केले आहे. भारतात एकिकडे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय, तर दुसरीकडे करोनावर उपचार करणाऱ्या औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यातच सीरम इन्स्टिट्युटला करोना लसी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला अमेरिकेतून येणारा कच्चा मालही कमी पडला. यावरुनच चीनने अमेरिकेला लक्ष्य केले आहे.