पुणे, दि. २५ (प्रतिनिधी) – कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी महत्वाच्या असणाऱ्या रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना त्याचा काळाबाजार करण्याच्या घटना वाढत आहेत. असाच प्रकार खडकी परिसरात घडला असून, या प्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले आहे. न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शुभम आरवडे (वय २२) , वैभव मळेकर (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. २४ एप्रिल रोजी खडकी परिसरातील पीएमपीएल बस स्थानक परिसरात ही घटना घडली.
खडकी परिसरातील एक बस स्टॉपच्या परिसरात आरोपी बेकायदा २ रेमडीसिव्हीर इंजेक्शन जवळ बाळगून त्याची छापील किमती पेक्षा जास्त किंमतीला विक्री करत असल्यानं असताना पोलिसांना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता, हे रेमडीसिव्हीर कोठून आणले?, त्यांनी रेमडीसिव्हीर इंजेक्शन काळ्याबाजाराने आणखी कोणाला विकले आहे का?, त्यांनी आणखी इंजेक्शनचा साठा केला आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भानूप्रिया पेठकर यांनी केली.