दौंड : गाईच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्याचा उपयोग पुर्वी घरोघरी केला जायचा,गवऱ्याचां मोठ- मोठ्या गंजी ग्रामीण भागात घरोघरी पहायला मिळायच्या परंतु आता या गवऱ्या लोप पावत चालल्यात. मात्र पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील नानगाव येथील बचत गटाच्या महिलांनी गवऱ्या तयार करुन त्या अमेझॉनवर ऑनलाइन विक्री करण्यास सुरवात केली आणि या गवऱ्याला परराज्य तेलंगणातुन मागणी आली.
तंत्रज्ञानाचा आधार घेत जगाच्या पाठीवर कोण काय विकेल हे सांगता येत नाही. दौंड तालुक्यातील नानगाव येथील महिलांनी चक्क अमेझॉनवर गाई-म्हशीच्या शेणाच्या गवऱ्या विकण्यास सुरवात केली. आणि तेलंगणामधून त्यांना 100 गवऱ्यांची मागणी देखील आली आहे. या मागणीचे पार्सल पोस्टाने आता तेलंगणा याठिकाणी पाठविण्यात आले आहे.
दौंड तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आश्लेषा शेलार यांच्या पुढाकाराने पाच वर्षापूर्वी श्री महिला बचत गटाची स्थापना केली. मागील काळात बचत गट जेमतेम सुरू होता. शेलार यांनी गवऱ्या थापण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्यांनी थेट अमेझॉनवर या व्यवसायाची नोंद केल्यानंतर 15 रुपयांना एक गवरी अशा भावाने विकली जात आहे. आता दौंड तालुक्यातील नानगाव मधील गवऱ्याना पुणे, मुंबई, दिल्ली याचबरोबर तेलंगणातुनही मागणी वाढायला लागली आहे.
नानगाव येथे महिला बचत गटाची स्थापना केल्या नंतर अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला. मसाला बनविणे, शेवया बनविणे, लोणचे बनविणे, असे अनेक व्यवसाय महिलांनी सुरू केले होते. परंतु,पहिल्यांदाच शेणापासून गवऱ्या बनविण्याचे काम गावातील महिला बचत गटातर्फे सुरू केले. ऑनलाईन विक्रीसाठी या गवऱ्या परराज्यात पाठविण्यात आल्या आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आम्ही देखील असे उपक्रम राबविणार असल्याचे स्थानिक महिलांनी बोलून दाखवल आहे.
नानगाव येथील बचत गटांनी तयार केलेल्या गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या तेलंगणा राज्यात निर्यात झाल्या आहेत. अमेझॉनवर बचत गटांनी तयार केलेल्या मालाची विक्री करणारे नानगाव हे तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे. शेणाच्या गवऱ्यांची अमेझॉनवर चांगली विक्री झाल्याने आता महिला बचत गटातील सर्व महिला या व्यवसायातुन उत्पन्न कमवणार आहेत.