पुणे -“ज्या दुकानातून दूध खरेदी केलं, तिथे ते परत करायला जायचं आहे,’ “कबुतराला खाणं द्यायला जायचंय,’ “पिझ्झा खायचा आहे’ या कारणांपासून ते “मी पॉझिटिव्ह आहे,’ “प्रेयसीला भेटायला जायचे आहे’ अशी एक ना अनेक कारणे पुणेकर पोलिसांना देत आहेत. पुणेकरांच्या या भन्नाट कारणांचा व्हिडिओच पुणे पोलिसांनी तयार केला असून, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी दिलेली कारणांची नेटिझन्सकडून चर्चा होत आहे.
कारणं असतीलही तुमच्याकडे बाहेर पडण्याची अनेक, पण जीवन आहे प्रत्येकाकडे एक.
नियम पाळा घरी रहा प्रत्येक.Brace yourself for some really ‘unbelievable’ excuses – Mala Jau Dya Na Baher!#MalaJauDyaNaBaher #ExcusesWeMake #StayHome #BreakTheChain #PunePolice pic.twitter.com/vPwlJ3vhU6
— CP Pune City (@CPPuneCity) April 24, 2021
पुणेकरांच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. यातच लॉकडाऊन काळात फिरण्यासाठी पुणेकरांनी सांगितलेली कारणेदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. यावर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून, नागरिकांना थांबवून त्यांना विचारणा करण्यात येत आहे.
मात्र, पोलिसांच्या चौकशीत काही पुणेकर अफाट कारणे देत असल्याचे चित्र आहे. याबाबत पुणे पोलिसांनी पुणेकरांच्या कारणांवर आधारित व्हिडिओची निर्मिती केली असून, हे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारणे आणि प्रसंग सांगितले आहेत.
एकाने बॅंकेत पैसे भरण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याला रविवार असल्याची आठवण करून दिली असता, “मला मेसेज आला आहे’ असे उत्तर मिळाल्याचे पोलीस कर्मचारी म्हणाले. तर पूर्वी सून सासू-सासऱ्यांना पाहून पदर डोक्यावर घ्यायची. आता पोलिसांनी बघून नागरिक मास्क तोंडावर घेत असल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी या व्हिडिओद्वारे सांगितले.