चंडीगढ – भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सतर्क जवानांनी बुधवारी रात्री घुसखोरीचा डाव उधळून लावला. ती घटना पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत घडली. भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न तीन पाकिस्तानी घुसखोरांनी केला. त्यांच्या संशयास्पद हालचाली बीएसएफ जवानांनी वेळीच हेरल्या.
घुसखोरांना रोखण्यासाठी जवानांनी गोळीबार केला. त्यामुळे घाबरून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांनी माघारी पाकिस्तानी हद्दीत पलायन केले. त्यानंतर घुसखोर जवळपास दडण्याची शक्यता ध्यानात घेऊन बीएसएफ जवानांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली.
पाकिस्तानी घुसखोर अनेकदा पंजाबमध्ये शिरकावाचा प्रयत्न करतात. त्यामागे तस्करीमार्गे अंमली पदार्थ पाठवण्याचा नापाक डाव असतो. मात्र, सतर्क भारतीय सुरक्षा दले ते डाव सातत्याने हाणून पाडतात.