मुंबई -इंडियन प्रिमियर लीगच्या साखळी स्पर्धेत अडखळती सुरुवात असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध जिंकून आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू करेल. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स, नंतर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सना नमवत विराट कोहलीच्या आरसीबीने पदक तालिकेत सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, या स्पर्धेतील तीनपैकी केवळ एकच सामना जिंकता आलेल्या राजस्थान रॉयल्सला आपले आव्हान टिकवण्यासाठी उद्या येथे वानखेडे स्टेडियमवर होणारा सामना जिंकावाच लागेल. तरच त्यांचे स्पर्धेतले आव्हान कायम राहणार आहे.
संजु सॅम्सनच्या नेतृत्वात खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्सने फक्त दिल्ली कॅपिटल्सला हरवले आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्वत: कर्णधार सॅमसनचे शतक निरुपयोगी ठरले होते तर दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकन जोडी डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांचीच कामगिरी लक्षवेधी झाली होती. एकसंध आणि विश्वासार्ह फलंदाजी होत नसल्याने राजस्थान रॉयल्सची कामगिरी निराशाजनक होते आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना जोस बटलरने आक्रमक खेळी केली, मात्र त्याला इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही.
गोलंदाजीच्या बाबतीतही राजस्थान रॉयल्सकडे चमकदार कामगिरी करणारे गोलंदाज नाहीत, हे वास्तव आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयाचा अपवाद वगळल्यास, राजस्थान रॉयल्सचे सर्वच गोलंदाज मुबलक धावा देताना दिसतात. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने एकदाच दिल्ली कॅपिटल्सविरोधात 15 धावांत 3 विकेट्स अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, तर चेतन सकारियाने थोडीशी चमक दाखवली आहे. आता जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत ख्रिस मॉरिस अथवा मुस्तफिझूर रेहमानकडून संघाला अपेक्षा असतील.
दुसरीकडे, आरसीबीला दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सच्या साथीला आता ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेल मधल्या फळीत खेळणार असल्याने, कोहलीच्या संघाची फलंदाजी अधिक मजबूत होताना दिसते आहे. कोहलीची फलंदाजी बहरात असली तरी त्याला एखाद्या मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच आहे. मागील हंगामात लक्षवेधी कामगिरी केलेला देवदत्त पडीक्कलही सध्या बहरात असून युवा रजत पाटीदारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
गोलंदाजीमध्ये आरसीबीची धुरा हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज उत्तमपणे सांभाळत आहेतच. मुंबई इंडियन्सविरुद्ध 27 धावांत 5 विकेट्स घेत हर्षल पटेलने आपला ठसा उमटवला आहेच, शिवाय शाहबाज अहमदने सनराझर्स हैदराबादविरुद्ध सात धावांत तीन विकेट्स घेत एकाच षटकात सामना आपल्या बाजूने फिरवला होता.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर