कोंढव्यातील हॉस्पिटलची तोडफोड
पुणे – कार्डियाक रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या दारात रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही घटना कोंढव्यातील प्राइम हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी डॉ. सिद्धांत तोतला (25, रा. मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबारा वाजता व्हिजिटला आले होते. त्यावेळी एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती. डॉ. तोतला यांनी त्याला तपासले, तेव्हा रुग्णाची नाडी लागत नव्हती. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळविले.
डॉ. ताबीश व डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. त्यांनी तेथे जमलेल्या 15 ते 20 जणांना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या आणि लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच हॉस्पिटलमधील अकाऊंटंट इमाम हुल्लर यांनाही मारहाण करून जखमी केले. सुरक्षा रक्षकाच्या केबिनची काच फोडून नुकसान केले. हॉस्पिटलसमोरील दरवाजावर दगड फेकत कुंडीमधील झाडे फेकून दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त देशमुख, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक ऐ. के. चाऊस यांनी प्राईम हॉस्पिटलला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.