बारामती/ जळोची – प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात करोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील,
गटविकास अधिकारी राहूल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव, अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विविध उपाययोजना करून देखील बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट प्राधान्याने करून घेण्यात यावे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी. सांगली जिल्ह्यात जसे मोबाइल करोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची करोनाची तपासणी केली जाते, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाइल व्हॅनद्वारे तपासणी करण्यात यावी.
रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे. तालुक्यातील वृध्दाश्रमामध्ये जाऊन वृद्धांची व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात यावी. आरोग्यसेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्यात याव्यात. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्री याची कमतरता भासल्यास औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांची मदत घ्यावी.
प्रसाद यांनी बारामती येथील पदाधिकारी, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील करोनाची सद्यस्थिती व करोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बारामतीच्या व्यापाऱ्यांबाबत उद्या निर्णय -पवार
डोर्लेवाडी-बारामतीतील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने उघडण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याबाबत पुण्यातील बैठकीमध्ये चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याबाबत आज रात्री किंवा रविवार सकाळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ते म्हणाले की, रेमडेसिवीरबाबत सरकारी दवाखान्यात तुटवडा जाणवत नाही. मात्र, खासगी हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे, याची कारणे वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.