नांदेड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच मराठवाड्यात तर कोरोनाने थैमान घातला आहे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन काही तासांत संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शासकीय मेडिकल कॉलेज येथे रुग्णांना चक्क परत पाठवले जात आहे.
संपूर्ण जिल्ह्यातून शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण नांदेड येथील डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे येथे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत पाठवले जात आहे. शनिवारी 6 एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी 200 बेडच्या जम्बो कोविड सेंटरला मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. पण आज ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं विदारक सत्य समोर येत आहे. तर बेड अभावी रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय.
या रुग्णालयातील परिस्थिती विषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही यावर काहीही उत्तर देणं टाळलं आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे काम अन्न आणि औषध प्रशासनाचे आहे, पण आज जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन अपुरा पडतो आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होतात, या सर्व प्रकाराला जबाबदार आणणाऱ्यावर कारवाही होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.