चिंताजनक परिस्थिती: जुन्नरमध्ये आता बेडचे संकट

जुन्नर  -करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांना जुन्नर तालुक्‍यातील रुग्णालयांमध्ये बेड मिळणे कठीण झाले असून कोविड केंअर सेंटरसह खासगी दवाखानेही “फुल्ल’ होण्याच्या मार्गावर आहेत.

जुन्नर तालुक्‍यात लेण्याद्री व ओझर येथे कोविड केअर सेंटर्स सुरू असून नारायणगाव येथे अद्ययावत कोविड रुग्णालय आहेत. या तीन शासकीय केंद्रांव्यतिरिक्‍त तालुक्‍यात 18 खासगी कोविड रुग्णालये कार्यरत आहेत. लेण्याद्री, ओझर येथील कोविड सेंटरमध्ये कोणतीही लक्षणे नसलेले, किंवा सौम्य लक्षण असलेले बाधित रुग्ण आहेत. हृदयविकार, रक्‍तदाब तसेच इतरही आजार असलेले नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक रुग्णालयांत दाखल होत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे लक्षणे नसलेले अनेक अनेकजण होम क्‍वारंटाईन झाले आहेत.

रेमडेसिविरसाठी धावाधाव
आधीच कोरोना बद्दल असलेली भीती आणि गैरसमज आणि अत्यवस्थ रुग्णांसाठी बेड मिळणे अवघड झाले आहे.असताना अशा रुग्णांना देण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्‍शन आणण्यासाठी मात्र रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. नारायणगाव, आळेफाटा, मंचर, पुणे, मुंबई जिकडे मिळण्याची आशा आहे अशा सर्व ठिकाणी चौकशी केली जात आहे, प्रसंगी पदरमोड करून मुंबई पुणे येथे सुद्धा जात आहे. रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात कधी उपलब्ध होणार आणि आधीच चिंतेत असलेल्या नातेवाइकांना कधी दिलासा मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

खासगी रुग्णालयांमधील स्थिती
जुन्नर तालुक्‍यातील विविध खासगी दवाखान्यांमध्ये कोविड सेंटर सुरू असून त्यामध्ये 338 बेडची क्षमता आहे. त्यामध्ये साधे बेड क्षमता 103 असून तेथे 77 रुग्ण आहेत आणि फक्‍त 26 बेड शिल्लक आहेत. आयसीयू बेड 45 असून ते सर्व फुल्ल आहेत. ऑक्‍सिजनची सुविधा असलेले 183 बेड असून आज रोजी फक्‍त 38 बेड शिल्लक आहेत. व्हेंटिलेटर असलेल्या बेडची क्षमता 7 असून फक्‍त2 बेड आज रिक्‍त आहेत. एकंदर तालुक्‍यातील कोरोना वाढीचा वेग पाहता अशीच परिस्थिती राहिली तर रुग्णांना बेड उपलब्ध होणे खूप जिकिरीचे होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.