पुणे – महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक आरोप झाले होते. आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलाने तृप्ती देसाईंच्या मदतीने बलात्काराचा आरोप केला आहे. यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, मेहबूब शेख यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. या आरोपांनंतर चाकणकर यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिष्ठित व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा अनेकांनी व्यवसायच मांडला आहे. या अशा लोकांच्या व्यवसायावरच स्वतःला वाघ समजणाऱ्या अनेक लांडग्यांचा राजकीय उदरनिर्वाह चालू आहे.@NCPspeaks @TV9Marathi @zee24taasnews @news_lokshahi @abpmajhatv 1/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 2, 2021
चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “प्रतिष्ठित व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा अनेकांनी व्यवसायच मांडला आहे. या अशा लोकांच्या व्यवसायावरच स्वतःला वाघ समजणाऱ्या अनेक लांडग्यांचा राजकीय उदरनिर्वाह चालू आहे.” चाकणकर यांच्या या टीकेला भाजपकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.