पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एका १९ वर्षीय तरुणाचे फोटो मॉर्फ करून ते टेलिग्रामवर टाकण्यात आले. त्यानंतर त्याला एस्कॉर्ट सेवा बुक केल्याच्या नावाखाली ब्लॅकमेल करून त्याच्याकडून सायबर भामट्यांनी तब्बल ७८ हजार रुपये उकळले. सायबर भामट्यांनी फसविण्याची ही नवी ट्रिक अवलंबली आहे. नाव बदनाम होण्याच्या भीतीने अनेकजण तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मात्र, तरुणाने धाडस दाखवून तक्रार दाखल केली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यात तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार पंकज भदैरिया आणि जगदीश नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण खासगी कंपनीत काम करतो. तो जीममध्ये असताना त्याला पंकज भदैरिया नावाच्या व्यक्तीने टेलिग्राम खाते तपासण्यास सांगितले.
त्याने ते तपासले असता, त्याचे आठ ते नऊ मॉर्फ केलेले अश्लिल फोटो दिसले. फिर्यादीने त्याला काय करायचे ते कर, असे म्हटल्यावर पंकजने त्याला त्याचा आई वडिलांचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता सांगितला, तसेच हे फोटो आई वडिलांना पाठविण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने घाबरला आणि पंकजने पाठवलेल्या क्युआर कोडवर त्याने ५०० रुपये पाठवून दिले.
घरी आल्यावर त्याला पुन्हा जगदीश नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तू एस्कॉर्ट सर्व्हिस बुक केल्याचे सांगत विमानतळ येथील एका हॉटेलवर जाण्यास सांगितले. फिर्यादीने नकार देताच आमची सर्व्हिस लिगल असून, तू गेला नाहीस, तर आमच्या मॅडम संजना तुझी पोलिसांत तक्रार करतील, अशी धमकी दिली, तसेच त्याला एस्कॉर्ट सर्व्हिसचा परवाना व्हॉटसअपवर पाठवला.
घाबरलेल्या फिर्यादीने आरोपी सांगतील त्याप्रमाणे तब्बल ७८ हजार ५०० रुपये पाठवून दिले. मात्र, आरोपींकडून पुन्हा १४ हजारांची मागणी करण्यात आली. तेव्हा मात्र फिर्यादीच्या खात्यात फक्त अडीच हजार रुपये उरले होते. त्यांच्या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार करत आहेत.